Monday, 29 August 2011

इरोम शर्मिला----- SocialWork without Marketing & PR Agency.


            सुरक्षा बल विशेषाधिकार कायदा (एएफएसपीए) रद्द करावा ह्या मागणीसाठी इंफाळ येथे इरोम शर्मिलागेले अकरा वर्ष उपोषण करीत आहे.न तिला उपोषणाची परवानगी,ना मिडिया कडून दखल.तिला जबरदस्ती उपोषण सोडाव्याला लावतात,३०६ ची आत्महत्येची केस लावतात,तुरुंगात डांम्ब्तात,ती सुटल्यावर पुन्हा उपोषणाला बसते.पुन्हा तुरुंग किंवा जेल पुन्हा जबरदस्तीने उपोषण सोडायला लावतात.हे कोणाला माहिती आहे?

आज ह्यावर स्वप्ना पाटकर ह्यांनी सामना उत्सव पुरवणी दिनांक ३० ऑगस्ट २०११ लिहिलेला वाचला.त्याचे शीर्षक समर्पक आहे.जाहिरातीत राहून गेलेली मालिका. तो लेख इथे देत आहे.आणि त्या खाली माझे विचार मांडत आहे.


आगाऊ सूचना: हा लेख हजारे ह्यांच्या विरुद्ध दिसत असला तरी तेवढाच मर्यादित नाही.शर्मिला बाबत चर्चा करताना सुरक्षा बल विशेषाधिकार कायदा (एएफएसपीए) हा एक महत्वाचा मुद्दा आहे.

जाहिरातीत राहून गेलेली मालिका


हा काहीच न कळण्याचा मोसम आहे असे दिसते. कलियुग संपून सुरू झालेल्या ‘सावळागोंधळ युगात’ सगळेच समजण्यापलीकडले वाटणे काही धक्का लागण्यासारखे नाहीच. ‘जो दिखता है वो बिकता है’ हा हल्लीचा नियम आहे. अर्ध्या तासाची मालिका पाहायला बसलात की 15 मिनिटे जाहिरातीतच जातात. मालिका चालावी म्हणून जाहिरात की जाहिरात चालावी म्हणून मालिका आहेत हे गणित मात्र कळत नाही. आयुष्याचे तसेच काहीतरी होते. जाहिरातींच्या गाजावाजात मनाला भिडणार्‍या मालिकांकडे दुर्लक्ष होते. अशीच एक मालिका म्हणजे इरोम चानू शर्मिला.

14 मार्च 1972 रोजी कोंगपाल कोंगखाम लेकार्ड, पोरोमपस, इंफाळ येथे तिचा जन्म झाला. श्री. इरोम नंदा आणि इरोम सखी यांची ही कन्या. आठ भावंडांमध्ये शर्मिला नेहमीच उठून दिसायची. जनावरांवर प्रचंड प्रेम करणे आणि आपली सायकल फिरवत गावातील सर्वांना भेटणे हाच तिचा छंद होता. संपूर्ण गावाची लाडकी शर्मिला सतत सर्वांना मदत करीत असे. प्रत्येकाशी प्रेमाने बोलून समजून वागणे या तिच्या स्वभावामुळे ती सगळ्यांनाच आवडत असे. ती 12 वर्षांची असताना तिचे वडील गेले. 1997 मध्ये तिच्या मोठ्या भावाचेही निधन झाले. खूप शिक्षण घ्यायची इच्छा असूनही परिस्थितीमुळे तसे जमले नाही. पण वाईट परिस्थितीने तिला तिच्या ध्येयापासून कधीच दूर केले नाही.

विचारवंत शर्मिलाने नेहमी सत्य व न्यायाचा मार्ग धरायचा हे मनाशी ठरवले होते. तिचे तत्त्वज्ञान व विचार वेळेबरोबर अधिक मजबूत व धारदार होत गेले. शिक्षण बारावीपर्यंतच करता आले, पण देशातील घडामोडी, साहित्य, मोठी व्यक्तिमत्त्वे यांचा अभ्यास तिने कधीच सोडला नाही. बातम्या पाहून तिचे मन नेहमीच तुटायचे. राजकारण आणि सामान्य नागरिकांची गळचेपी हा तिच्या जीवनातील अस्वस्थतेचे कारण ठरणारा मुद्दा आहे. हत्याकांड, मारहाण, अन्याय, मानवाधिकारांचे उल्लंघन हे सगळं का होतं असे तिने अनेकदा स्वत:लाच विचारले. गावातील थोरांशी चर्चा करताना ती आपल्या शंका त्यांच्यासमोर ठेवायची, पण उत्तरे कुणीच देऊ शकत नव्हते.

जस्टीस सुरेश यांच्या ‘पीपल्स ट्रिब्युनल’मध्ये तिचा सहभाग होता. हिंदुस्थानी सेनेतील एका जवानाने गावातील एका युवतीवर बलात्कार केल्याचे ऐकून तिचे हृदय थरारून निघाले. बरेच दिवस ‘ट्रिब्युनल’च्या या चर्चेत ती हरवलेली असायची. तिचे कशातही लक्ष लागत नव्हते अन्यायाविरोधात आपण का नाही लढत या विचाराने ती स्वत:ला छळत होती. ऑक्टोबर 2000 पासून तिचे विचारमंथन सुरूच होते.

तेवढ्यात 2 नोव्हेंबर रोजी मालोम येथे तुलीहत्म विमानतळावर सुरक्षा दलाकडून 10 लोकांची हत्या करण्यात आली. शर्मिला आपली सायकल चालवत घटनास्थळी पोहोचली. त्या घटनेची ती प्रत्यक्षदर्शी आहे. सुरक्षा दलाने केलेल्या मानवाधिकाराच्या उल्लंघनाच्या निषेधार्थ तिने 2 नोव्हेंबर 2000 पासूनच उपोषण सुरू केले आहे. सुरक्षा बल विशेषाधिकार कायदा (एएफएसपीए) रद्द करावा अशी शर्मिलाची मागणी आहे. हा कायदा कोणतीही कायदेशीर कारवाई न करताच सुरक्षा बलांना गोळी मारण्याचे अधिकार प्रदान करतो.

लहानपणापासूनच ती गुरुवारचे उपोषण करायची. जगात अनेकांना जेवण मिळत नाही. मीही आठवड्यातून एक दिवस जेवणार नाही. हे तिने बरीच वर्षे पाळले. योगायोग असा की, 2 नोव्हेंबर 2000 सुद्धा गुरुवारच होता. उपोषण सुरू केल्यानंतर काही दिवसांतच शर्मिलाला अटक करण्यात आली. 5 नोव्हेंबर 2000 रोजी अटक झाली. कलम 306 म्हणजेच आत्महत्येच्या प्रयत्नांतर्गत तिला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. जोपर्यंत माझी मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत माझे उपोषण थांबणार नाही अशी घोषणा शर्मिलाने न्यायालयातही केली.

तिचे उपोषण तोडण्याकरिता व तिला जिवंत ठेवण्याकरिता जबरदस्तीने जवाहरलाल नेहरू इस्पितळात ठेवले. अत्यंत हाल करून लसीद्वारे नळ्या लावून तिला अन्न देण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी केले. कलम 306 ची सहा महिने-वर्षभराची सजा संपली की शर्मिला परत सुटली. नव्याने उपोषण सुरू केले. परत पोलीस येतात. तिला पकडून नेतात आणि परत तेच तेच. शर्मिला सांगते, मला पकडून धरले जाते. मी काहीच नाही करू शकत. मला सुया टोचल्या जातात. नाकात नळ्या लावल्या जातात. या परिस्थितीत मी फक्त सहन करते. पोलिसांच्या तावडीत ती वाचन करते, कविता लिहिते, लेख लिहिते. आताच तिची हाडे ठिसूळ झाली आहेत. वजन कमी होत चालले आहे. 11 वर्षांचे हे उपोषण तिचे शरीर करीत आहे.

ती सांगते मालोममधील दृश्य मला अजून खाते. सामान्य जनतेने झेललेल्या गोळ्या मला झोपू देत नाहीत. त्या मृतांमध्ये 18 वर्षांचा सिनम चंद्रमनी होता. त्याला 1988 मध्ये हिंदुस्थान सरकारकडून शौर्य पदक मिळाले होते. त्याला आपल्याच सुरक्षा दलांनी गोळ्या घालून मारले. तेही उगाच. मी हे नाही विसरू शकत. 2004 साली जस्टीस जीवन रेड्डी यांची कमिटी बसवली गेली. सरकारला त्या कमिटीने हा कायदा बदलावा असा सल्लादेखील दिला पण त्याचे पुढे काहीच झाले नाही. कायदा तसाच राहिला आणि शर्मिलाचे उपोषणही तसेच राहिले. आजही ती सामान्य माणसांच्या जगणे या अधिकारासाठी आपले आयुष्य त्यागून रोज संघर्ष करीत आहे.

उपोषण सुरू केले तेव्हा ती 28 वर्षांची होती. आज ती 39 वर्षांची आहे. तरीही सरकार झोपलेले आहे. बडे बडे तिला भेटून गेले व तिने उपोषण बंद करावे असे सांगूनही गेले, पण मदतीचा हात मात्र कुणाकडून आला नाही. तिचे आयुष्य आता जवाहरलाल नेहरू इस्पितळात नळ्या लावून सुटकेची वाट पाहणे आणि सुटल्यावर उपोषणावर जोर लावणे. सरकार जसे उठून बसले आहे, मीही तेच करणार असे ती ठामपणे सांगते.

आज समाजसेवेलाही मार्केटिंग आणि पीआरची गरज आहे. ती कोणत्या राज्यकर्त्यांना ओळखत नाही. तिचा दिल्लीशी काहीच संबंध नाही. कुणी बाबा किंवा आध्यात्मिक गुरू तिला ओळखत नाही हेच तिचे दुर्दैव. नाही तर आज मणिपूरमध्येदेखील रामलीला मैदान भरले असते. आय. एम. शर्मिला अशा टोप्या कुणी छापल्या नाहीत आणि छापणारही नाही, पण शर्मिलाला त्याचे काहीच वाटत नाही. तसे पाहिले तर देशात जागोजागी रामलीला मैदान सजले पाहिजे. कुचकामी सरकार असले की अन्यायाशिवाय दुसरे काय मिळणार! आज संपूर्ण देश सरकारविरोधात भडकला आहे. प्रत्येकाला बदल हवा. जेवढे रस्त्यावर उतरले तेवढ्यांनी जरी मतदान केले तर बदल घडेल. शर्मिला एक सत्याशी आपली भेट घडवणारी एक मालिका आहे, ती जाहिरात नाही. तिचे पोस्टर नाही लागले. तिच्या जाहिराती टीव्हीवर नाही दिसल्या. मुळात देशाला शर्मिला कोण हेही नीट माहीत नाही. आपण फक्त जाहिरातीत गुंतलोय. जरा डोळे उघडा. टीव्हीवर जाहिराती पाहताना चुकून एखादी चांगली मालिकाही पाहा.शर्मिलाच्या ‘गाजावाजा’विना चाललेल्या उपोषणाचे फळ तिला मिळो व तिच्या शौर्याची मालिका संपूर्ण जगात पसरो ही माझी इच्छा आहेे. पण एकमात्र आहे जाहिरातींनी मनोरंजन ‘सॉलिड’ होते.

content courtesy :www.saamana.com
for Link click HERE

No comments:

Post a Comment

Dear Reader,
Thanks for visiting My Blog .Your comments are truly valuable.
Please feel free to share your ideas,suggestions,criticism,feedback for my posts.

If you want to write to me personally,email me at sonalidesai7@gmail.com